PM Kisan : 8 व्या हफ्त्याचे 2000 रूपये अकाऊंटमध्ये येणार, लवकरच मिळणार ‘बळीराजा’ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील शेतक-यांना आर्थिक मदत करणा-या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हफ्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत. अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह बहुतांश राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतक-यांना ही रक्कम लवकरच दिली जाणार असल्याचे समजते. एप्रिल अखेरपर्यंत सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2 हजारांप्रमाणे 6 हजाराची मदत केली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी केंद्र सरकार एकाच वेळी सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना 20 हजार कोटी जाहीर करणार आहे. कृषी मंत्रालयाने आपल्या वतीने सर्व तयारी पुर्ण केली आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला आहे. पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी 65 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले. इतर लोकांची पडताळणी होताच पैसे पाठविण्यात येणार आहेत.

कोणाला अन् कसे या योजनेचा लाभ घेता येईल, जाणून घ्या

1) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेतीजमीन असणे आवश्यक आहे. जमीन जर शेतकऱ्याच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच आयकर विवरणपत्र भरणारे, डॉक्टर, वकिल आदींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

2) या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmkisan.nic.in या वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा. मग एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यानंतर आपला आधार नंबर, मोबाइल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर आपल्याला स्थितीबद्दल पूर्ण माहिती मिळेल.

3) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे गरजेचे आहे.