#Loksabha 2019 : अमित शहांचा निवडणूक आयोगावर घणाघात

कोलकाता : वृत्तसंस्था – भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करताना अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे. आयोगाला जर लाज वाचवायची असेल तर तृणमूलच्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहांनी केली आहे.

भाजपाने काढलेल्या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणात जनता सहभागी झाली होती. ज्या मार्गावरून रॅली जात होती त्या मार्गावरील मेडिकल कॉलेजच्या आवारातून रॅलीवर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच झालेल्या पळापळीत काही नागरिक जखमी झाले. रॅलीवर करण्यात आलेला हा भ्याड हल्ला असून जनतेमध्ये भीती पसरवण्याचा प्रकार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच या हिंसेला शांततेत मतदानाने उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळत असलेला जनतेचा पाठिंबा पाहून विरोधक घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमित शहा यांनी काढलली रॅली जवळपास आठ किलोमीटरची होती.

या रॅली दरम्यान तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्य़कर्त्यांमध्ये राडा झाला. तसेच अमित शहा यांच्या ट्रकवर देखील काठ्या भिरकावण्यात आल्या.