पुण्यात 31 डिसेंबरला एल्गार परिषद आयोजित करण्याचा निर्णय, पोलिसांकडे मागितली परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. परंतु, 31 डिसेंबरला रोजी पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद (Elgar Parishad) होणार असल्याची घोषणा करण्यात आली असून या कार्यक्रमाला परवानगी मिळावी अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. या निमित्ताने पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत स्वारगेट येथील गणेश क्रीडा कला केंद्रात बैठक झाली. या बैठकीत 31 डिसेंबरला एल्गार परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

पुण्यात होणाऱ्या 31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच याप्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आलं आहे.

कोरेगाव-भिमा येथे गर्दी न करण्याचे आवाहन
1 जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे हजारो लोक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण राहणार आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही राजकीय सभा किंवा पुस्तकांचे स्टॉल उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.