पहिल्या वहिल्या मुंबईकर पेंग्विनचा दुर्देवी अंत

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईन 
मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील हम्बोल्ट जातीच्या ‘फ्लिपर’ या पेंग्विन मादीने  नुकताच पहिल्या पिल्लाला जन्म दिला होता. परंतु जन्मानंतर अवघ्या ८ व्या दिवशीच या पिल्लाचा मृत्यू झालाय. २२ ऑगस्टला सकाळपासूनच या पिल्लाची प्रकृती ढासळण्यास सुरूवात झाली आणि हे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले.  लाखो रुपये खर्च करून या राणीच्या  बागेत हे पेंग्विन्स आणले होते.
[amazon_link asins=’B077L4X3PN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7d67dca-a7b0-11e8-a25f-7b523600365f’]
याबाबत मिळालेली अधिक, १५ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या या पिल्लाची प्रकृती अचानक बिघडल्याने पशुवैद्यांच्या पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी भारतात जन्मलेल्या या पहिल्या पेंग्विन पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ज्ञ विभागातील प्राध्यापकांच्या पथकाने २३ तारखेला सकाळी ९.३० वाजता प्राणी संग्रहालय रूग्णालयात या पिल्लाचे शवविच्छेदन केले. नवजात पिल्लातील विसंगती आणि यकृतातील बिघाड यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण त्यावेळी नोंदवण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या सोलमधून भारतात मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात तीन नर आणि पाच मादी पेंग्विन यांचे आगमन झाले. त्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांचीही रीघ लागली. राणीबागेत स्थिरावलेल्या सात पेंग्विनमध्ये १५ ऑगस्ट रोजी आणखी एका पेंग्विनची भर पडली. स्वातंत्र्यदिनी रात्री आठच्या सुमारास मोल्ट आणि फ्लिपर या जोडीचे पिल्लू अंडे फोडून बाहेर आले आणि पहिला मुंबईकर पेंग्विन जन्माला आला. परंतु, आजाराने या पहिल्या वहिल्या मुंबईकर पेंग्विनचा दुर्देवी अंत झाला.