तरुणांच्या प्रयत्नातून नगर विकास मंचाची स्थापन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, आरोग्य यासारखे पायाभूत प्रश्न देखील आजवर सुटू शकलेले नाहीत. बेरोजगारीमुळे शहरातील युवा वर्ग नैराश्याने ग्रासला आहे. सामान्य नगरकरांच्या दैनंदिन आयुष्यातील या आणि अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी शहरातील विविध समाज घटकांतील सर्वसामान्य तरुणांनी एकत्रित येऊन नगर विकास मंचाची स्थापना केली असल्याचे मंचाच्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषित केले आहे.

मंचाच्या वतीने सुकाणू समितीचे गठन करण्यात आले असून यामध्ये श्रीपाद दगडे, मंगेश गोंडलकर, अभिजित कुलकर्णी, सुदाम लगड, सागर बोडखे, स्वप्नील पाठक आदींचा समावेश आहे.

नगर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बापूसाहेब भापकर, हिराबाई भापकर, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, भाई सथ्था, मधु दंडवते, भाऊसाहेब फिरोदिया, रुपीबाई बोरा, दिनुभाऊ कुलकर्णी, नवनीतभाई बार्शीकर, शंकरराव घुले, झुंबरशेठ सारडा, रामावतार मानधना, श्रीकृष्ण निसळ, गोपाळराव मिरीकर, जानकीबाई आपटे अशा विविध क्षेत्रातील अनेक नगरकर मान्यवरांनी या शहराच्या प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे. मात्र आता त्याच्या केवळ आठवणी उरल्या असून शहराची सर्वच आघाड्यांवरील सद्य स्थिती उदासीन व अंतर्मुख करणारी आहे.

यामुळेच “ध्यास विकसित नगर शहराचा, सामान्य नगरकरांच्या स्वप्नांचा” असे मंचाचे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे. नगर विकास मंचाच्या माध्यमातून आगामी काळात शहर विकासाच्या दृष्टीने परिवर्तन होण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मंचाच्या ब्रीदवाक्यास अनुसरून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

शहरातील महिला, युवा वर्ग, नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, क्रीडा, जेष्ठ नागरिक, इतर दुर्बल घटक आदी विविध घटकांशी मंचाच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. लोकसहभागातून शहर विकासासठी चळवळ उभी केली जाणार असल्याचे मंचाच्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.