एक्झिट पोलवाल्यांची मतदारांकडून पुन्हा एकदा ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मतदान पूर्ण होण्याची वाट न पहाता एक्झिट पोल दाखविणाऱ्या सर्वच वाहिन्यांना मतदारांनी चकवा दिल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेषत: छत्तीसगडमधील सर्व वाहिन्यांच्या एक्झिट पोलचे अंदाज अक्षरश: फोल ठरले आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशात सायंकाळी मतदान संपायच्या वेळी मतदान केंद्रावर मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. एकूण मतदानांच्या तुलनेत सायंकाळी ५ वाजल्यानंतर झालेले हे मतदान अनेक ठिकाणी १० ते १५ टक्क्यांपर्यंत होते. त्याचा कोठेही एक्झिट पोलमध्ये समावेश नसल्याने सर्वच वाहिन्यांच्या एक्झिट पोलला मतदारांनी आपला हिसका दाखविला आहे. केवळ वातावरण आणि एकमेकांच्या आघाडी यावर आडाखे बांधून केलेले हे अंदाज सपशेल फेल ठरले आहेत.
छत्तीसगडमधील मतदारांनी एक्झिट पोलवाल्यांची पोलखोल केली आहे. याठिकाणी भाजप व काँग्रेसमध्ये चुरस होईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. टाइम्स नाऊने तर भाजप ४६ जागा घेऊन सरकार बनविण्याचा अंदाज व्यक्त केला होता. इतरांनीही चुरस असेल पण भाजपचे सरकार येईल, असे अंदाज दिले होते. छत्तीसगडमधील निकालाने सर्व एक्झिट पोल सपशेल उताणे पडले आहेत. त्यातल्या त्यात इंडिया टुडेचा काँग्रेसचा जागांचा अंदाज थोडासा निकालाच्या जवळ जाणारा ठरला. त्यांनी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला ५५ ते ६५ जागा सांगितल्या होत्या. प्रत्यक्षात काँग्रेसला ६८ जागा मिळाल्या आहेत.

राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेस यांना एक्झिट पोलमध्ये दाखविलेल्या जागा व प्रत्यक्षात मिळालेल्या जागा यात खूप तफावत आहे. भाजप ७३ पर्यंत खाली जाईल, असे इंडिया टुडे वगळता कोणालाही वाटले नाही. काँग्रेसला मिळणाऱ्या जागाबाबतही मोठा फरक दिसून आला आहे.
सर्वाधिक एक्झिट पोलची गंमत मध्य प्रदेशाबाबत दिसून आली. त्यात एबीपी लोकनितीने काँग्रेसला तब्बल १२६ जागा व भाजपला ९४ जागा दाखविल्या होत्या. त्याच्यापेक्षा भाजपची कामगिरी चांगली झाली असून काँग्रेस त्या संख्येपर्यंत पोहचू शकली नाही. मध्य प्रदेशाबाबत सर्वच वाहिन्यांचा गोंधळ दिसून आला. त्यांनी एक्झिट पोलमध्ये १०२ ते १२२ इतकी मोठी तफावत दाखविली होती. प्रत्यक्ष मतमोजणीतही त्याचा प्रत्यय आला. कधी भाजपची आघाडी दिसून येत होती तर कधी काँग्रेस पुढे होती.

एका अर्थाने भारतीय समाज हा कधीही आपल्या मनातील मत उघड करत नाही. त्यामुळे कितीही एक्झिट पोल घेतले तरी त्यातून केवळ अंदाज व्यक्त करणे शक्य होते. नेमक्या किती जागा कोणाला मिळतील, हे सांगणे शक्य होणार नाही हे पुन्हा एकदा दिसून आले.

…’त्या’मुळेच झाला भाजपचा पराभव : विहिंप