युट्युबवर व्हिडीओ पाहून त्याने छापल्या नकली नोटा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वडील रिक्षाचालक… आरटीओमध्ये एजंटाप्रमाणे काम करणार म्हणून मुलाला संगणक आणि प्रिंटर घेऊन दिला. परंतु त्याने ते काम करण्याऐवजी युट्यूबवर व्हिडीओ पाहून दोनशे रुपयांच्या नकली नोटा बनविण्याचे काम सुरु केले. त्या त्याने चॉकलेट, बिस्कीटे आणि छोट्या वस्तू विकत घेऊन वटवल्याही. परंतु पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. अवघ्या पंधरा दिवसातच गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पोलिसांना याची भणक लागली आणि तो जाळ्यात सापडला. पोलिसांनी तरुणाला अटक करत त्याच्याकडून प्रिंटर, कागद आणि एकाच क्रमांकाच्या दोनशे रुपयांच्या सात नोटा जप्त केल्या आहेत. सोहेल सलीम शेख (२१, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात होती. त्यावेळी  भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करून एकजण शहरात वेगवेगळ्या भागात तो वटवत असल्याची माहिती पोलिस कॉन्सटेबल शंकर संपते यांना बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा मागोवा काढला जात होता. मात्र तो हुलकावणी देत होता. परंतु २१ जानेवारी रोजी शंकर संपते यांना माहिती मिळाली की, तो मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी नरपतगिरी चौकात सोहेल शेख. याला सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे २०० रुपयांच्या IAQ701672 या एकाच क्रमांकाच्या नकली नोटा मिळाल्या. त्याचे वडील रिक्षाचलक आहेत.

तो आरटीओमध्ये एजंटाचे काम करणार असल्याने त्याला वडीलांनी प्रिंटर आणि संगणक घेऊन दिला. त्यानंतर त्याने युट्युबवर बनावट व्हिडीओ बनविण्याचा व्हिडीओ पाहिला. त्यावरूर त्याला नकली नोटा तयार करण्याची शक्कल लढविली. प्रिंटरवर त्याने पाचशे, दोन हजार, दोनशे रुपयांच्या नोटा स्कॅन केल्या परंत त्यातील केवळ दोनशे रुपयांची नोटत हुबेहुब स्कॅन होत होती. इतर दोन नोटांची रंगसंगती मॅच होत नसल्याने त्याने केवळ २०० रुपयांच्या नोटाच तयार केल्या, त्यानंतर छोटी दुकाने चालविणारे वृद्ध नागरिक, महिला, पानटपऱ्या येथे चॉकलेट, सिगारेट, बिस्किटे, खरेदी करून त्या वटविल्या. पोलिसांनी त्याने नोटा तयार करण्यासाठी वापरलेले प्रिंटर, कागद आणि ब्लेड असे साहित्य जप्त केले आहे. त्याच्यावर समर्थ पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायायलाने त्याला २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, गणेश पवार, सहायक पोलीस फौजदार शंकर पाटील, कर्मचारी सुनील पवार, शंकर संपते. रमेश चौधर, सचिन ढवळे, निलेश शिवतरे, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.