‘या’ कुटुंबाने ‘भारतरत्न’ पुरस्कार स्विकारण्यास दिला नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध दिवंगत गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. पूर्वोत्तर भारतासाठीचं प्रस्तावित नागरिकत्व संशोधन विधेयक – 2016 मुळे ‘भारतरत्न’ वर बहिष्कार टाकल्याचे भूपेन हजारिका यांचा मुलगा तेज हजारिकां यांनी सांगितले.

आसाम सरकारच्या नागरिकत्वाच्या विधेयकावरचा वाद चिघळतो आहे. ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना सरकारने मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला होता. मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात हा पुरस्कार स्वीकारणार नाही असं त्यांचे पुत्र तेज हजारीका यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकार समोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

तर काही दिवसांपूर्वीच आसामच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकावर काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीका केली होती. आपण नेहमीच आसामच्या लोकांसोबत आहोत असं तेज हजारीका यांनी म्हटलं आहे.

आसमी संगीत जगभर पोहोचवत चित्रपट सृष्टीला अनेक अजरामर गीतं देण्याचं काम भुपेन दा यांनी केलं. आसाम जिल्ह्यातल्या तिनसुखीया जिल्ह्यात 8 सप्टेंबर 1926 ला त्यांचा जन्म झाला. गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीवर आपली अमीट छाप सोडली.

फक्त आसमीच नाही तर त्यांनी हिंदीसहीत अनेक भारतीय भाषांमधली त्यांची गाणी प्रचंड गाजली. “दिल हूम हूम करे” आणि “ओ गंगा तू बहती है क्यों” ही त्यापैकी महत्त्वाची गाणी. 5 नोव्हेंबर 2011ला त्यांचं निधन झालं.