दिल्लीमध्ये ‘हॉरर’ किलिंग ! २५ वर्षीय मुलीचा खून करून मृतदेह 80 Km दूर नाल्यात टाकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेम विवाह केल्यामुळे २५ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. हा खून मुलीच्या घरच्यांनीच केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील न्यू अशोक नगर मध्ये घडली असून, शीतल चौधरी असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याबद्दल वडील रवींद्र, आई सुमन, काका संजय, ओम प्रकाश, आत्येभाऊ प्रवेश व जावई यांना अटक करण्यात आली आहे.

मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाराज होते कुटुंब 
शीतलचे शेजारी राहणाऱ्या अंकित नावाच्या मुलासोबत ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी घरात न कळवता ऑक्टोबर २०१९ मध्ये आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले. लग्न झाल्यावरही तिच्या घरचे ते लग्न तोडण्यासाठी तिला जबरदस्ती करत होते, परंतु ती ऐकत नसल्यामुळे ३० जानेवारी रोजी तिचा खून करून मृतदेह ८० किलोमीटर दूरवर नाल्यात फेकून दिला. पतीने पोलिसांना शीतल बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यामुळे ही बाब उघडकीस आली आहे.

तरुणीच्या पतीने दाखल केली तक्रार
अंकितने शीतल चा फोन लागत नसल्याचे सांगत, त्याने न्यू अशोक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कुटुंबीयांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शीतल कुठे आहे सांगण्यास टाळाटाळ केली. पण शीतलचा शोध कुठेही न लागल्यामुळे पोलिसांना तिच्या कुटुंबावर संशय आला. पोलिसांनी बराच तपास केला आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शीतलचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह एका पांढऱ्या रंगाच्या वॅगनर मध्ये ठेवून, ८० किलोमीटर दूर असलेल्या एका नाल्यात टाकून दिला. चौकशी दरम्यान ह्या गोष्टी समोर आल्या आहेत.

You might also like