सरकारचा निषेध करत शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाटले मोफत कांदे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड)- केंद्रातील व राज्यातील भाजपच्या सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. कामगार, शेतकरी व शेतमजुरांच्या विरोधी हे भाजपाचे सरकार असल्याची टीका शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केली. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा बाजारभाव गडगडला आहे. याचा निषेध म्हणून शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (शनिवार) सकाळी दहा वाजता शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांना मोफत कांदा व दुध वाटून आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापती सुजाता पवार, सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समिती माजी उपसभापती मोनिका हरगुडे, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, संचालक दिलीप मोकाशी, शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखिले, बाळासाहेब घाडगे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे बाळासाहेब नागवडे, संचालक सुरेश पाचर्णे, नामदेव जाधव, जिल्हा सरचिटणीस संतोष भंडारी, पंडित दरेकर, रूपेश घाडगे, माजी शहराध्यक्ष जाकीर खान पठाण शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, महिला अध्यक्षा संगीता शेवाळे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, दिनकर पाडळे, पोपटराव दसगुडे यासह तालुक्यातील कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी आमदार अशोक पवार म्हणाले की, कांदा या पिकाचा उत्पादन खर्च एकरी ५० हजार रूपये होत असताना स्वामीनाथन समितीच्या नियमानुसार ३० रूपये किलो कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे असे सांगून पुर्वी ज्या प्रमाणे नाफेडच्या माध्यमातून शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांची अडचण सोडवली. त्याप्रमाणे आता शासनाने १० रूपये किलो शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

कांद्या बरोबर दुधाचेही दर कमी केल्याने दुध व्यसायाची वाईट अवस्था असुन नियोजनशून्य कारभारामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असल्याची खंत व्यक्त करून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किंमती वाढवून चांगले दिवस दाखवले असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

यावेळी शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन होत असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांद्या रस्त्यावर न फेकता गोरगरिबांना मोफत देऊन अनोखे आंदोलन करत शासनाचा निषेध करत शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी आंदोलन कर्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून केली. या कार्यक्रमात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने नागरिकांना कांदे व दुध पिशवी मोफत वाटप करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे तर सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले आहे.