‘या’ मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा शेळ्या, मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा

सांगली | पोलीसनामा आॅनलाइन – शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन काढण्यात आला. तालुक्यातील दुष्काळ हा तीव्र असल्याचे शासन परिपत्रकानुसार जाहीर झाले तरीही येथील संबंधित अधिकार्‍यांनी या भयानक परिस्थितीकडे डोळेझाक केली आहे. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने या झोपलेल्या यंत्रणेला जाग आणण्यासाठी आज बुधवारी तहसीलदार कचेरीवर जानवरांसह मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

परिसरातील मेंढपाळ आपल्या शेळ्या, मेंढ्या, गाईगुरासह (जनावरे) बैलगाड्यासह या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चासमोर बोलताना शेतकरी विरोधी कायदे रद्द करा असे मत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने यांच्याकडून मांडण्यात आले. तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीने रुद्र रूप धारण केले आहे. तरी प्रशासकीय यंत्रणा अश्या गंभीर परिस्थितीकडे डोळेझाक करीत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, शेळ्या मेढ्यांना कित्येक मैल फिरले तरी चारापाणी मिळेनासे झाले आहे.

पिण्याच्या पाणी, जनावरांचा चाऱ्याची उपलब्धता व्हावी म्हणून संबंधित यंत्रणेस वेळोवेळी निवेदनाद्वारे सुचित केले आहे, म्हैशाळ ताकारी आरफळ ठेंभू या कालव्यातून कोरडी असणारी तळी, तलावं व नदी नाल्या मध्ये पाणी सोडून बंधारे भरून द्यायला हवेत व जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासाठी चारा दावणीला दिला पाहिजे. पण ही यंत्रणा पुर्णपणे सुस्त झाली आहे. यांना जागे करून आपला हक्क मिळवून देण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. असेही माने म्हणाले.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या –

1)संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा व पुन्हा कर्ज होवू नये यासाठी डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करा.
2)म्हैशाळ पाणी योजनेतून अग्रण नदीत पाणी सोडून लोणारवाडी पर्यंतचे नदीवरील बंधारे भरून द्या.
3)एकरी बागायत शेती साठी अडीच लाख रुपये व जिरायती शेती साठी एक लाख रुपये मदत तातडीने मिळावी.
4)शेतीपंपाची वीज माफ करावी.
5)जाचक वीज बिलांच्या वसुलीसाठी जळालेल्या विद्युत जनित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष व विलंब बंद करून ताबडतोब डिपी बदलून द्यावेत.

या आणि अश्या अन्य मागण्यांसाठी आज कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तालुका अध्यक्ष नंदकुमार पाटील, रावसाहेब कुंभार, रणजित माने, जेष्ठ नेते केरबा हजारे, सचिन माने, किसन डुबूले, सदामते यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे शिवनेरीवर, मातीचा कलश रामजन्मभूमीला नेणार