खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन

खराडी येथील झेन्सॉर आयटी पार्कजवळ सॅण्डविच स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा विद्युत कारणांमुळे आग लागली नाही. तसेच रोहित्राचा स्फोट झालेला नाही किंवा त्यातून ऑईलसुद्धा बाहेर फेकल्या गेले नाही असे विद्युत निरीक्षक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधीत सॅण्डविच स्टॉल चालकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की खराडी येथे झेन्सॉर आयटी पार्कजवळ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी रोहित्राजवळील स्टॉलला आग लागली होती. परंतु महावितरणचे 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र सिमेंटच्या चौथर्‍यावर सुस्थितीत होते व त्यातून एकूण क्षमतेच्या 37 टक्के जोडभार देण्यात आले होते. तसेच या रोहित्राभोवती लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या रोहित्राच्या लगतच एक फूट अंतरावर असलेल्या ए-वन सॅण्डविच स्टॉलमध्ये आग लागली. स्टॉलमागील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी पेट घेतला व या पेटलेल्या फांद्या तुटून रोहित्र व वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे रोहित्र व वीजवाहिन्या जळाल्या. परंतु या वीजयंत्रणेने पेट घेण्यापूर्वीच महावितरणकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा अन्य विद्युत कारणांमुळे आग लागलेली नाही हे विद्युत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेले आहे.

आगीनंतर सॅण्डविच स्टॉलमध्ये गॅसचे एक सिलिंडर, शेगडी, रेग्यूलेटर, पाईप हे अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले होते. या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे व याप्रकरणी संबंधीत सॅण्डविच स्टॉलचालकाविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

संबंधित घडामोडी:

रोहित्राच्या स्फोटात गरम ऑईल अंगावर पडल्याने आयटीमधील दोन कर्मचारी जखमी