पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ वनवा पेटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज नवीन बोगद्याजवळ वनवा पेटल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. अभिनेते सयाजी शिंदे व त्यांच्या काही मित्रांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येथे दाखल होत हा वनवा विझवला आहे. त्यामुळे मोठी घटना टळली आहे. आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

कात्रज नवीन बोगद्याच्या परिसरातील दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात डोंगर परिसर आहे. त्यामुळे झाडीही मोठ्या प्रमाणात आहे. तत्पुर्वी रविवारी सायंकाळी अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र पुण्याहून सातारा जिल्ह्यात जात होते. सातार्‍यात त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. परंतु, बोगद्याजवळ आल्यानंतर त्यांना टेकडीवर मोठा वनवा पेटल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ सहकार्यांसोबत येथे धाव घेतली. तसेच, स्वत: सहकार्यांसोबत पेटलेला वनवा विझण्यास प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नानंतर हा वनवा विझविण्यात त्यांना यश आले.

दरम्यान, याची माहिती अग्निशमन दल किंवा पोलिसांना नव्हती. सयाजी शिंदे यांनी याची माहिती दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी वनवा पेटला असून, आगीचा प्रकार नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले. अग्निशामन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, याबाबत आपल्याला कॉल आलेला नाही. सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी वनवा विझविल्याने मोठी घटना टळल्याचे सांगण्यात आले.