कामगार पुतळ्याजवळ गोळीबार करणारा रावण टोळीतील मोक्कामध्ये फरार आरोपी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडमधील रावण साम्राज्य आणि महाकाली या टोळ्यांतील टोळीयुद्धातून बुधवारी तिघांन महाकाली टोळीच्या एकावर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार केल्याचा प्रकार घडला. यात एकजण जखमी झाला होता. यात गोळीबार करणारा एकजण हा रावण साम्राज्य टोळीतील मोक्कांतर्गत फरार असलेला गुंड असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपनर यांनी दिली. याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत आहेत.

रोहन चंडालीया, अक्षय साबळे व त्यांच्या एका साथीदारावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) याने फिर्याद दिली आहे.

सिद्धेश्वर शर्मा हा महाकाली टोळीचा सदस्य आहे. तर अक्षय साबळे हा रावण साम्राज्य टोळीतील सदस्य आहे. मागील काही महिन्यांपुर्वी रावण साम्राज्य टोळीवर देहूरोड पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. अक्षय साबळे हा या मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सिद्धेश्वर शर्मा, त्याचे मित्र प्रतिक डोके, गणेश पुरी, सोनु शेख हे तिघे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्र. ३ जवळ कामगार पुतळ्याजवळ रेल्वे लाईनच्या सुरक्षा भिंतीजवळ झाडाखाली उभे होते. त्यावेळी अक्षय साबळे व त्याचे दोन साथीदार त्याच्या दोन मित्रांसह एका दुचाकीवरून तेथे आला. त्यावेळी त्यांच्यात आधीच्या वादातून त्यांनी शर्मा याला शिवीगाळ केली. त्यानंतर शर्मा व त्याचे साथीदार रेल्वे लाईनच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागले. त्याचवेळी अक्षय साबळे याने रिव्हॉल्वर रोखून सिद्धेश्वर याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर परिसरात एकच धांदल उडाली होती. पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी नक्की गोळीबार झाला की नाही याची खात्री करून पुढील तपासाला सुरुवात केली.

चक्क न्यायालयाजवळ गोळीबार झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची व शिवाजीनगर पोलिसांची पथके सध्या त्यांचा शोध घेत आहेत.