मुंबईत मान्सूनचा पहिला बळी ? खेळताना 5 वर्षाचा चिमुरडा नाल्यात पडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ठाणे या भागात मान्सून सक्रीय झाल्याचे वृत्त वेधशाळेकडून देण्यात आले. मान्सूने मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचे पहायला मिळत आहे. असे असताना मात्र मुंबईत एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. पोलीस अग्निशमक दल आणि स्थानिक नागरिक या मुलाचा शोध घेत आहेत.

ही धक्कादायक घटना घाटकोपर येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये घडली. हुसैन हमीद शेख असे मृत मुलाचं नाव असून तो खेळता खेळता नाल्यात पडला. नाल्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई-वडीलांनी नाल्यात उडी मारली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आई-वडीलांना नाल्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून गेल्या तीन तासांपासून मुलाचा शोध सुरु आहे.

दरम्यान, पर्जन्य जलवाहिनी असलेल्या या नाल्याच्या भोवती भिंत बांधण्याचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे हुसैन याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे, मान्सूनने कोकणातील हरणे पासून सोलापूरपर्यंत मजल मारली आहे. संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्येही व्यापले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रीय झाला आहे.