चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ‘हाफ तिकीट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जागतिक स्तरावर आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या ‘हाफ तिकीट’ या दर्जेदार मराठी चित्रपटाने मराठी मनोरंजन क्षेत्रात नवचैतन्य फुलवले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दक्षिणात्य चित्रपट ‘काक मुक्ताई’ चा मराठी रिमिक असलेला ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला असंख्य चित्रपट महोत्सवामधून नावाजले त्याचबरोबर याला अनेक पुरस्कार देखिल मिळाले आहे.

या चित्रपटात दोन भावांच्या संघर्षाची गोष्ट् दाखविली आहे. यामध्ये शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांच्या सहज-सुंदर अभिनयाला भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी दिग्गज कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

या चित्रपटाचे निर्माते नानुभाई जयसिंघानी यांनी सांगितले की, “हाफ तिकीट’ चित्रपट पुढच्या एक ते दोन महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होण्यास उत्सुक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चीनसारखी मोठी बाजारपेठ आता मराठी चित्रपटांसाठी सुद्धा खुली आहे. हे सांगण्यास मला आनंद होत आहे’.

चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड यांनी सांगितले की, ‘माझ्यासाठी व माझ्या संपुर्ण टिमसाठी हा सुवर्णक्षण आहे. मराठी चित्रपट आज जागतिक स्तरापर्यंत पोहचत आहे. याचा मला खुप आनंद आहे.’ हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे.