तब्बल  ९ वर्षांनी सापडली हिरे जडित सोन्याची अंगठी 

न्यूयार्क  : वृत्तसंस्था –  पौला स्टँटन (वय -६०)  या महिलेची हिरेजडित सोन्याची अंगठी नऊ वर्षांपूर्वी टॉयलेटमध्ये ‘फ्लश’ झालेली मौल्यवान अंगठी स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संबंधित महिलेला परत मिळाली आहे. लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाला ही अंगठी तिला तिच्या नवऱ्याने गिफ्ट म्हणून दिली होती. अंगठी सैल असल्याने  टॉयलेटची स्वच्छता करताना पौला यांच्या बोटातून गळून पडली आणि टॉयलेटमध्ये ‘फ्लश’ झाली.

२००९ साली  ही घटना घडली होती. त्यामुळे ही अंगठी त्यांनी कायमची गमावली असे त्यांना वाटले होते काही दिवसापूर्वी त्या आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. जेव्हा त्या परत आल्या त्यांच्या दारावर एक चिठ्ठी लावली होती. या चिठ्ठीवर ‘पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ला संपर्क साधा, असा निरोप लिहिला होता. त्यामुळे त्यांना घराजवळ खोदकाम करायचे असे वाटले. जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेल्या तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्या विभागातील टेड गोगोल (६४) नामक कर्मचारी ड्रेनेज लाइनची नियमित देखभाल-दुरुस्तीची कामे करत असताना चिखल आणि राडारोड्यामध्ये एक वस्तू चमकत असताना त्यांना दिसली. त्या वेळी ती अंगठी असल्याचे त्याच्या लक्षात आले.

काही वर्षांपूर्वी एक महिला या परिसरात हरवलेली अंगठी शोधत असल्याची घटना त्यांना आठवली. त्यांनी लगेच पौला यांचे घर गाठले. तिथे कुलूप असल्याने चिठ्ठीही लिहून ठेवली. स्टँटन दाम्पत्याची आद्याक्षरे  त्या अंगठीवर कोरलेली असल्याने ती अंगठी त्यांचीच असल्याची खात्री झाली.