छोट्या पडद्यावरील संभाजी राजे डॉ. अमोल कोल्हे यांना १५० तलवारींची भेट

मुंबई : वृत्तसंस्था – डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेतून  अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली जबरदस्त छाप पाडली आहे. ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांना आजवर विविध कार्यक्रमात तब्बल दीडशेहून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांचं तलवारींशी एक वेगळंच अतूट असं नातं निर्माण झालं आहे.

ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होत. त्यांची ही मालिका आजही लोकांच्या समरणात आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांची भूमिका साकारत असताना अमोल कोल्हे यांना विविध ठिकाणी त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून तलवार भेट दिली जाते. त्यापैकी दोनच तलवारी त्यांनी स्वत:कडे ठेवल्या असून, उर्वरित तलवारी त्यांनी टीममधल्या लोकांना देत असतात.

आपल्या अभिनयाने महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर मांडणारे अमोल कोल्हे यांनी आजपर्यंत ‘शंभूराजे’ या नाटकाचे ५२० प्रयोग तर ‘शिवपुत्र संभाजी राजे’ या महानाट्याचे  १२५ प्रयोग केले आहे.