मुलीनं लग्नाला नकार दिल्यानं तरूणानं घेतला गळफास

पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी येथे लग्नासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न जमल्यानंतर सुद्धा मुलीने लग्नासाठी नकार दिला म्हणून मानसिक तणावाखाली येऊन तरुणाने आत्महत्या केल्याचं प्रकार चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडला. या संदर्भात पोलिसांनी संबंधित तरुणीला अटक केली आहे.

भरत कृष्णा तळपे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णा केशव तळपे ( वय ५५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, उषा बाळू सरोगदे (वय २३, रा. खडकुंबे, ता. जुन्नर, जि पुणे) या तरुणीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, भरत आणि आरोपी तरुणी उषा यांचा विवाह ठरला होता. २१ जुलै ते ३१ जुलै या दरम्यान उषाने भरतला किरकोळ कारणांवरुन लग्न करण्यास नकार देऊन त्याला मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर ३१ जुलै रोजी भरतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी भरतने लिहलेली चिट्ठी सापडली असून, त्यात आपल्या आत्महत्येस उषाच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी उषाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करुन तिला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.