संगणक अभियंत्याकडून एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चेन्नई येथून मैत्रनीस हिंजवडी येथील घरी बोलावून संगणक अभियंत्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पिनाक नेपाल मुजुमदार (३०) या संगणक अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीत काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाक नेपाल मुजुमदार आणि संबंधित तरुणी हे ओळखीचे असून दोघे मित्र आहेत. २०१२ ला दोघेही चेन्नई येथे एकत्र नोकरी करत होते. परंतु,२०१७ ला मुजुमदार हा हिंजवडी येथील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत झाला. दोघांचे फोन आणि मेसेजद्वारे केवळ मित्र या नात्याने बोलणे सुरू होते. मध्यंतरी आरोपी मुजुमदारचा वाढदिवस झाला तेव्हा देखील तरुणी हिंजवडी येथे आली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात चेन्नई येथून तरुणीला मुजुमदारने राहत्या घरी बोलावून ‘तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू काहीच उत्तर देत नाहीस’ असं म्हणून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी घाबरलेल्या अवस्थेत त्याच रात्री चेन्नईला निघून गेली.

दरम्यान, रविवारी या प्रकरणी तरुणीने हिंजवडी येथे येऊन फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपी हा फरार आहे. तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.