चोरीला गेलेल्या सोन्याच्या वस्तू पोलिसांनी केल्या परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याचे दागिने करून देण्याच्या बहाण्याने सोने घेऊन गेलेल्या कारागिराने दागिने न देता ३४ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचा अपहार केला. याप्रकरणी कारागिर राकेश खेतमल मेहता (रा. जितेकर वाडी, चिरा बाजार, मुंबई) याच्या विरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी राकेश मेहताला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल स्वप्नील कोठारी यांना परत करण्यात आला. कोठारी यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती.

राकेश मेहता याने १ एप्रिल २०१८ ते ४ जून २०१८ दरम्यान वेळोवेळी सोन्याचे दागिने बनवण्यासाठी कोठारी यांच्याकडून सोने घेऊन गेला होता. मात्र, सोन्याचे दागिने बनवून न देता तो निघून गेला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्नील कोठारी यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात मेहता विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

दत्तवाडी पोलिसांनी पळून गेलेल्या मेहताचा शोध घेऊन त्याच्याकडून फसवणूक करण्याच्या हेतूने लपवून ठेवलेला सोन्याचा सर्व मुद्देमाल जप्त केला. स्वप्नील कोठारी यांनी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळावा यासाठी न्यायालयाचे आदेश प्रप्त केले. न्यायालयाच्या आदेशानुसार दत्तवाडी पोलिसांनी ३४ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने कोठारी यांना परत केले. त्या वेळेस स्वप्नील कोठारी यांनी पोलीस विभागाने अत्यन्त तत्पर तपास करून आमचा चोरीस गेलेला सोन्याचे दागिने परत मिळवून दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अनिल डफळ, पोलीस हवालदार तानाजी निकम, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, सोमेश्वर यादव यांनी केली.