Good News ! वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70:30 कोटा पद्धत रद्द करुन मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडीत, सतीश चव्हाण यांनी मागणी केली होती. या मागणीला आता यश येताना दिसून येत आहे.

राज्यातील MBBS सह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धत राज्य सरकार रद्द करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यामध्ये एक बैठक झाली आहे. भाजप सेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली होती. यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

मराठवाड्यात 6 आणि विदर्भात 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. अशावेळी 70:30 कोटा निर्माण करुन प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खासकरून मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धती रद्द करत अनेक वर्षांच्या या मागणीला हिरवा कंदील दिल्याची माहिती समजतय. येत्या एक दोन दिवसांत अधिकृत घोषणा होऊन शासन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.