सरकार ला ‘कामगार दिन’ साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही

मुंबई: पोलिसनामा ऑनलाइन

महाराष्ट्रातील बहुसंख्य कामगारांवर अन्याय होत असताना आपल्या सरकारला कामगार दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तसेच कामगार भवनात कामगारांवरील अन्यायाचे निवशारमषनियमांप्रमाणे 90 दिवसांत का होत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील संपुर्ण जग साजरे करत असते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील समस्त कामगारांनी महाराष्ट्र दिन साजरा करतानाच कामगारांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ आपल्या सरकारच्याविरोधात हातावर काळ्या फिती लावून सरकारविरूध्द आपला राग, रोष व्यक्त करावा, असे आवाहन करत अशा प्रकारे आम्ही कामगार दिन साजरा करत असल्याचे सांगितले आहे. ज्या महाराष्ट्रात आपण जागतिक कामगार दिन साजरा करत आहोत त्या महाराष्ट्रातील कामगार खरोखरच सुखी समाधानी आहे का?, अस प्रश्नही चव्हाण यांनी आपल्या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

कंत्राटी कामगारांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन व इतर सुविधा भत्ता आजमितीस बर्‍याच अस्थापनेत मिळत नाही. हे आपणास व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना समाहित असूनही त्यावर कोणतीच कारवाई केली का जात नाही? स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य मिळावे यासाठी शासनामार्फत कोणती यंत्रणा राबवली जात आहे? असे अनेक प्रश्न मनोज चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.