सरकारला बारबालांची कीव, शेतकऱ्यांची नाही : सुमनताई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या सरकारला गोरगरीब व शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही. त्‍यांनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारला बारबालांची कीव येते पण अन्नधान्य देऊन भूक भागवणाऱ्या शेतकऱ्यांची येत नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी केला आहे. तासगाव तालुक्यातील कौलगे येथे विविध विकासकामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होत्‍या. त्यांनी डान्सबार, दुष्कळ, नोटाबंदी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. यावेळी अविनाश पाटील यांच्यासह सतिश पवार, डी. के. पाटील, प्रकाश औताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुरेश पाटील, जयसिंग जमदाडे, दिनकर पाटील, मनिषा माळी व मान्यवर उपस्थित होते.

सुमनताई म्हणाल्या की ,’राष्‍ट्रवादीचे दिवंगत आमदार आर.आर. पाटील यांनी गोरगरिबांची कुटुंबे वाचावीत व तरुणाई भरकटू नये, यासाठी मोठा विरोध पत्करून डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला. पण सध्याच्या सरकारला गोरगरीब व शेतकऱ्यांशी काही घेणेदेणे नाही. त्‍यांनी सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे.अच्छे दिन आणे वाले है म्हणत जनतेची फसवणूक केली आहे. नोटबंदी करून अनेक निष्पाप बळी घेतले आहेत’. राज्‍य सरकारने डान्सबार बंदींबाबत न्यायालयात योग्‍य पद्धतीने बाजू मांडली नसल्यामुळे डान्सबार बंदी उठविण्यात आली. असा आरोप यावेळी सुमनताई यांनी केली.

सरकारने योजना सुरळीतपणे न चालविल्याने दुष्काळ – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुमनताई म्हणाल्या की, ‘आर.आर.पाटील यांनी तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी विसापूर, पुणदी, ताकारी, आरफळ यासह अन्य योजना मार्गी लावल्या. परंतु, सध्याच्या सरकारला या योजना सुरळीतपणे चालविता येत नसल्यामुळे दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. आर.आर.पाटील यांच्या काळात झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात सत्ताधारी व्यस्त आहेत. त्यांना जनतेचे काही घेणेदेणे नाही. राष्ट्रवादीने दुष्काळा बाबत विधानसभेत आवाज उठविला, विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषण केले, तालुक्यातील सर्व गावांना पाणी मिळावे यासाठी पयत्न केले. पण सत्ताधारी भाजप-शिवसेनेने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. येणारे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात शिल्लक असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नांसह अन्य प्रश्न मार्गी लावण्यास कटिबद्ध आहे.’’ असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

mla sumantai patil criticized on bjp government