शेतकऱ्यांना दिलासा, आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यातील आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी, कालच सरकारने १५१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी २५० मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
जाहिरात
राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर रोजी १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर, आज २५० मंडळे दुष्काळ यादीत घेणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ट्रीगर वन, ट्रीगर टू आणि ग्राऊंड सर्व्हेच्या आधारे जे तालुके दुष्काळ यादीत बसले त्या १५१ तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच ७०० मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा २५० मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.
तसेच एक समिती गठीत करण्यात आली असून दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाजू असतील, याबाबत आलेली निवेदने असतील, याची तपासणी करून त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.