रेशन कार्ड नसणार्‍यांनाही स्वस्त दरात सरकारने धान्य द्यावे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे नागरिकांकडे कामधंदा नसल्यामुळे रक्कम नाही. त्यातच राज्यात शिधापत्रिका नसलेल्या गरजूंची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा सरकारने किफायतशीर किमतीत धान्य विकत द्यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली आहे.

मुनगंटीवार यांनी, राज्यात ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही ही त्यांना सुद्धा परवडणार्‍या दरात धान्य देण्यात यावे. ज्या शिधापत्रिका धारकांकडे भगव्या रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 1 मे पासून धान्य न देता त्याचे वाटप लगेच सुरू करवे, अशी मागणी केली आहे. सरकारने वेळप्रसंगी पाचशे ते हजार कोटीपर्यंत खर्च करून लोकांना स्वस्त दरात धान्य किंवा किराणा किट उपलब्ध करून द्यावे. असे केल्यास लोक अन्नधान्य खरेदी करायला घराबाहेर पडणार नाही आणि त्यामुळे करोनाच्या संसर्गाचा धोका सुद्धा कमी होईल.

राज्याचे सकल उत्पन्न हे साधारणपणे तीस लाख कोटींच्या आसपास आहे हे लक्षात घेता सध्याची टाळेबंदी समजा पंधरा दिवसांनी जरी वाढवली तर राज्याचे साधारणपणे सव्वा लाख कोटी पर्यंत नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठीच पाचशे ते एक हजार कोटी रुपये खर्च करून लोकांना परवडणार्‍या दरात धान्य वाटप करणे हे अधिक फायद्याचे ठरेल असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.