Corona Vaccine : ऑक्टोबरपर्यंत दुसर्‍या देशांना व्हॅक्सीन देणार नाही सरकार, भारतातच होणार लसीचा वापर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीमुळे देशभरात या घातक व्हायरसने संक्रमित होणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी सरकार लसीकरण अभियानाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या दरम्यान अनेक राज्यांना कोरोना व्हॅक्सीनच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे, देशातील नागरिकांना पुरेसे डोस न देता इतर देशांना अगोदर लस पाठवल्याने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकार ऑक्टोबर 2021 च्या अखेरपर्यंत कोरोना व्हॅक्सीनचा कोणताही मोठा साठा निर्यात करणार नाही आणि व्हॅक्सीनचा वापर देशात केला जाईल.

अनेक देशांवर होणार निर्णयाचा परिणाम
सरकारच्या निर्णयाने जगभरात लसीच्या पुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम ’कोव्हॅक्स’चे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारताच्या या निर्णयाने बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अनेक अफ्रीकन देशांसमोर व्हॅक्सीनचे संकट उभे राहिले आहे.

काही देशांना सध्या मिळणार नाही व्हॅक्सीन
भारताने आतापर्यंत हॅक्सीनचे 6.6 कोटी डोस निर्यात केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, भारत आता आपल्या देशातच लसीकरणाला बळ देईल कारण येथील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अंतर्गत प्रकारे भारताने काही देशांना सांगितले सुद्धा आहे की, त्यांनी सध्याच्या स्थितीत भारताकडून व्हॅक्सीन मिळण्याची आशा करू नये. मात्र, हे समोर आलेले नाही की हे देश कोणते आहेत.