राज्यपालांनी ‘प्रथम’च घेतली ‘मराठी’तून शपथ, 59 वर्षातील पहिलाच ‘प्रसंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९ वे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी राजभवनात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी कोश्यारी यांना शपथ दिली. कोश्यारी यांनी शपथ घेताना एक महत्वाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला दिला. राज्यपालपदाची शपथ घेताना त्यांनी ती मराठीतून घेतली आहे.

Image result for Governor Bhagat Singh Koshyari oath

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठी साहित्यिक, कलावंत केंद्र सरकारशी संघर्ष करीत असताना मराठी साठी ही एक सुखद घटना ठरली आहे. मुळचे उत्तराखंडचे भगतसिंह कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी मिळविली आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आणिबाणीत त्यांनी तुरुंगावासही सोसला. २००० साली स्थापन झालेल्या उत्तराखंड राज्याचे २००१ मध्ये ते मुख्यमंत्री बनले. २००२ मधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यानंतर ते विरोधी पक्षनेते बनले. मात्र, २००७ मध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यावर त्यांना आमदारांचा पाठिंबा असतानाही भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री न करता मेजर जनरल भुवनचंद्र खंडोरी यांना मुख्यमंत्री केले होते.

महाराष्ट्राला आतापर्यंत बहुसंख्य वेळा दक्षिणेतील नेते राज्यपाल म्हणून मिळाले आहेत. त्यांना मराठीच काय अनेकदा हिंदीही येत नसल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी काही राज्यपालांनी महाराष्ट्राला आपले मानले. राज्यात कधीही अस्थिर राजकीय परिस्थिती न आल्याने राज्यपालांना राजकीय भूमिका घेण्याची फारशी वेळ आली नाही.

आजवरच्या कोणत्याही राज्यपालांनी महाराष्ट्रात आल्यानंतरही मराठीला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला नाही. ते एक तर हिंदी किंवा इंग्रजीतूनच आपले सर्व व्यवहार करत. शंकर दयाल शर्मा यांच्या १९८६ – १९८७ च्या कारकिर्दीनंतर आलेले सर्व राज्यपाल दक्षिणेतील असल्याने त्यांचा मराठीशी काहीही संबंध आला नव्हता. ते आपली सर्व भाषणे प्रामुख्याने इंग्रजीतूनच देत. त्यांच्यापैकी कोणीही ५ वर्षाच्या कारकिर्दीत मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून ते दूरच राहिले होते.

भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीतून शपथ घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची कारकिर्दीची सुरवात करुन एक चांगला संदेश सर्वांना दिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आपल्या भाषेत बोलू शकेल, संवाद साधू शकेल असा राज्यपाल मिळाला आहे.