पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

खडकी(पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग कालकर यांच्या हस्ते बीए, बीकॉम, बीबीए, बीसीए, व बीएससी आदी विभागांच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कायक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी भूषविले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास पंगुडवाले, सचिव आनंद छाजेड, सहसचिव गणेश नाईकरे, संचालक ज्ञानेश्‍वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. यु. मुलाणी आणि सर्व संचालक व प्रा. सीमा देशपांडे, प्रा. राजेंद्र लेले, डॉ. अलका झिमरे आदी प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कालकर यांनी सांगितले की, आपण जे ज्ञान व संस्कार अर्जित केले, त्यांचा वापर समाजामध्ये करून यश मिळवावे. नोकर्‍यांची कमी उपलब्धता पहता पुढील आयुष्यात आपल्या कल्पकतेने, कलाकौशल्याने वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग निर्माण करून रोजगार निर्मिती करण्याचे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तर अध्यक्षीय भाषणात श्री. गोयल यांनी मोठी स्वप्नं बाळगून त्यांचा पाठलाग करा. कष्ट करा.त्यामुळेच पैशाची किंमत कळते. नोकरी न मागता नोकरी देणारे व्हा. त्यासाठी सकारात्मक राहून आत्मविश्‍वासाने पुढे जात रहा, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

tikaram 1

कार्यक्रमाच्या सुरुवातीस ढोल व लेझीम पथकाच्या साथीत पदवीधर विद्यार्थ्यांसह पाहुण्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी हातात झेंडा घेऊन संचलन केले. त्यानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून विद्यापीठगीताने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षाविभागप्रमुख प्रा. डा. उर्मिला सडोलीकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात पदवी मिळाली तरी शिक्षण थांबत नाही. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवत राहतो. या अनुभवातून स्वतःला ओळखायला शिका असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. पाहुण्यांचा परिचय प्रा. अरुण शेलार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. गौरी माटेकर यांनी केले. प्रा. नमिता कुलकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रा. जे.डी. नाईक, प्रा. योगिता झोपे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

tikaram 2

tikaram 4