शहर आरपीआय मधील गटबाजी पुन्हा उफाळली

पक्षविरोधी भुमिका घेणार्यांना बाहेरच ठेवण्याचा निर्धार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या शहरातील गटबाजीने पुन्हा डोके वरती काढले आहे. पक्षाचा राजीनामा देत स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्यांना चार रिपब्लिकन नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करू, असा निर्धार पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे, श्रमिक आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले यांनी राजीनामे देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वार्थापोटी पक्षविरोधी वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.

या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, आयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, निलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे,,संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, फर्जाना शेख, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले “रामदास आठवले पक्षासाठी जो निर्णय घेतील त्याचे पालन करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करायला हवे. पक्षातून बाहेर पडून विरोधात काम करणे योग्य नाही. पक्षाने आजवर या नेत्यांना खूप काही दिले. मात्र त्यांच्या अपेक्षा वाढतच आहेत. आठवले यांचे नाव पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेऊ नये, असा ठराव झाला आहे.” बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांचा निषेध केला.