गुजरात प्रमाणेच पुण्यात हेल्मेट सक्ती रद्द करावी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही शहरातील हेल्मेट सक्ती रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती पुणे हेल्मेट विरोधी कृती समितीने दिली.

हेल्मेट विरोधी कृती समितीची आज बैठक झाली. या बैठकीनंतर समितीचे अंकुश काकडे, संदीप खर्डेकर आणि प्रदीप देशमुख यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की पुण्यासारख्या शहरात 10 ते 15 किमी वेगाने वाहने चालतात. अशा ठिकाणी हेल्मेट वापरणे अडचणीचे ठरते. मागील 15 वर्षांपासून आम्ही यासाठी पाठपुरावा करत आहोत. परंतु पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हेल्मेट सक्ती लागू केली. रस्त्यात अडवून जबरदस्तीने दंड वसुली केली जात आहे. आम्ही केलेल्या आंदोलनानंतर ही जबरदस्तीने पोलीस पूर्वीच्या खटल्यांचे पैसे द्यावे यासाठी अडवणूक केली जाते.

हेल्मेट वापराला कोणाचा विरोध नाही परंतु तो शहरात ऐच्छिक असावा. हायवे वर हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे, याबाबत दुमत नाही. मात्र गुजरात प्रमाणे पुणे शहरात हेल्मेट सक्ती करू नये, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे काकडे, खर्डेकर आणि देशमुख यांनी सांगितले.