26/11 च्या मुंबई हल्ल्यातील ‘हा’ हिरो लढवणार NCP च्या तिकीटावर दिल्लीची ‘निवडणूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील हिरो माजी एनएसजी कमांडो आणि आपचे आमदार सुरेंदर सिंह हे पुन्हा एकदा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, यावेळी ते आपच्या तिकीटावर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वत: याची माहिती दिली आहे.

मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी दोन हात करणारे एनएसजी कमांडो सुरेंदर सिंह यांनी 2013 मध्ये आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत कँन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सलग तीनवेळा निवडून आलेले करन सिंह तन्वर यांचा पराभव केला होता.

सुरेंदर सिंह यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. आपल्याला अनेक पक्षांकडून यासाठी ऑफर होती मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी याबाबत माहिती देईन असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपने पुन्हा तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या सुरेंदर सिंह यांनी मंगळवारी ट्विटद्वारे आपण आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. आपल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी लिहले आहे की, आज मी खूप दु:खी आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे.

मुंबई हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी लढताना ते गंभीर जखमी झाले होते. यामध्ये त्यांना अपंगत्व आले होते. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना भारतीय लष्कराच्या सेवेतून निवृत्ती घ्यावी लागली होती. त्यानंतर 19 महिने त्यांना पेन्शन मिळाली नाही. यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे उंबरठे झिजवले. दरम्यान, ते आपचे नेते आरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले. काही काळानंतर त्यांना पेन्शन सुरु झाली. सुरेंदर सिंह यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यांना केजरीवाल यांनी आपची उमेदवारी दिली. यामध्ये ते विजयी झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा –