कोरेगाव भीमा प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना हाय कोर्टाचा झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेतून नक्षलवादी विचारांना प्रोत्साहन देऊन कोरेगाव भीमा येथील दंगलीत मदत केल्याबद्दल तसेच बंदी असलेल्या संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात विद्रोही लेखक आनंद तेलतुंबडे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला. मात्र, त्याचवेळी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी या निकालाला त्यांनी ३ आठवड्यांची स्थगिती देऊन आनंद तेलतुंबडे यांना दिलासा दिला आहे.

३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली होती. एल्गार परिषदेला बंदी असलेल्या माओवादी संघटनेने आर्थिक मदत केली होती. तसेच कोरेगाव भीमा येथे दंगल घडविण्यातही त्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी पी वरावरा राव, वर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांना अटक केली होती. त्यावेळी आनंद तेलतुंबडे यांच्या गोव्यातील घरावरही पोलिसांनी छापा घातला होता. पण ते त्यावेळी घरी नव्हते. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर तेलतुंबडे यांनी आपला या घटनेशी काहीही संबंध नसून आपल्याला या गुन्ह्यातून वगळावे, असा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यावर दोन्ही पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. पोलिसांनी त्यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांची माहिती देऊन त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तीवाद केला होता. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर तेलतुंबडे यांच्या वकिलांनी या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती केली. तेव्हा न्यायालयाने आपल्या निकालाला ३ आठवड्याची स्थगिती दिली.