Coronavirus Lockdown : अंत्यसंस्कारासाठी लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी ‘पायपीट’, परिस्थिती ‘गंभीर’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच एक हादरवणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असल्याने एका बापाला 5 वर्षांच्या मुलाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 88 किमी अंतराची पायपीट करावी लागली. ही घटना आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील आहे. बुधवारी या व्यक्तीच्या 5 वर्षांच्या मुलाचे निधन झाले. हा व्यक्ती आंध्रप्रदेशातील गोरंटला या एका लहानशा गावात राहतो. लॉकडाऊनमुळे येथील सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी या बापाला 88 किमी चालत प्रवास करावा लागला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. याचे पालन व्हावे यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. लोकांना गर्दी करण्यास मज्जाव आहे. याशिवाय अनेक मजुरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सगळ्यात 102 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाला हरवणे शक्य असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यास लॉकडाऊनचे नियमही शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे.