खून करून फरार झालेला पती 7 वर्षांनी महाबळेश्वरात सापडला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भररस्त्यात पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीस तब्बल सात वर्षानंतर महाबळेश्वर येथून अटक केली आहे. शिवराम बाबू तागडकर (वय-६५ वर्षे, रा. वडारवाडी, भिंगार) हे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अमोल शिवराम तागडकर, वय- २२ वर्षे, रा. वडारवाडी, भिंगार यांचे वडील शिवराम बाबू तागडकर व आई सुमन शिवराम तागडकर यांचे आपसात पटत नव्हते. तक्रारदार यांचे वडील शिवराम तागडकर हे नेहमी त्यांचे पत्नीचे चारित्र्यावर संशय घेत होते. आपसात नेहमी वाद होत असल्यामूळे शिवराम तागडकर हे कुटुंबापासून वेगळे रहात होते. पत्नीची भेट झाल्यानंतर तिला मारण्याची धमकी देत होते. दि ०९/११/२०१२ रोजी दुपारी तक्रारदार यांची आई शुक्रवार बाजारात गेल्यानंतर कॅन्टोन्मेट चाळीजवळ रोडवर आरोपी शिवराम तागडकर याने त्याची पत्नी सुमन तागड़कर हिचे पोटावर, छातीवर चाकूने वार करुन तिचा खून केला होता. सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पो.स्टे. येथे गुरनं. 1 ११/२०१२, भादंवि कलम ३०२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी शिवराम तागडकर, रा. वडारवाडी, भिंगार हा फरार झालेला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खब-याकडून माहीती मिळाली कि, वरील नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी शिवराम तागडकर हा नाव बदलून महाबळेश्वर येथे रहात असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस कर्मचारी दत्ता हिंगडे, भागीनाथ पंचमुख, आण्णा पवार, रविन्द्र कर्डिले, दिपक शिंदे, चालक बाबासाहेब भोपळे अशांनी मिळून महाबळेश्वर येथे जावून सदर आरोपीचा शोध घेवून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने प्रथम त्याचे नांव, पत्ता रमेश तागड, रा. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यांस विश्वासात घेवून त्याचे खरे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे खरे नांव, पत्ता शिवराम बाबू तागडकर, वय-६५ वर्षे, रा.वडार वाडी, भिगार असे असल्याचे सांगीतले.

सदर आरोपी हा महाबळेश्वर येथे रमेश तागड. रा. पुणे या नावाने एका हॉटेलमध्ये वॉचमनचे काम करीत होता. त्यास ताब्यात घेवून भिंगार कॅम्प पो.स्टे. ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पो.स्टे. हे करीत आहेत.