तेली समाजात शिक्षणाचा प्रसार महत्त्वाचा : डॉ. सूर्यवंशी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – समाज मोठा होण्यासाठी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्याने समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांमध्ये बदल होईल. त्याचप्रमाणे समाजातील घटस्फोटांचे प्रमाणदेखील कमी होईल, असे प्रतिपादन नाशिक येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले.

नाशिक महानगर तेली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर व पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या देशात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जोरात सुरू आहे. त्याचाही आपणही समाजातील मुलींना उच्च शिक्षण देऊन, तसेच तिचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

तत्पूर्वी जनार्दन बेलगावकर यांच्या हस्ते वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तर वध -वर परिचय सूचीचे प्रकाशन भाजप युवा नेते विक्रांत चांदवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर ॲड. यतीन वाघ , मनपा गटनेते गजानन शेलार, भानुदास चौधरी, महानगर अध्यक्ष प्रवीण चांदवडकर, मेळावा सचिव सुनील शिरसाठ, हितेश वाघ, सेवानिवृत्त शहर अभियंता उत्तम पवार,माजी उपमहापौर सुमन बागले, अंजली आमले, उषा शेलार, माजी अध्यक्ष प्रवीण पवार, संतोष वाघचौरे, कैलास पवार, हेमंत कर्डिले, वैशाली शेलार, सुनीता सोनवणे, नितीन व्यवहारे, पवार आदी उपस्थित होते.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त समाजाचे माजी अध्यक्ष अविनाश खैरनार, आंतरराष्ट्रीय वुशू खेळाडू दीप्ती चांदवडकर, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष स्वप्नील शेलार, सुरगाण्याच्या नगराध्यक्षा सोनाली बागूल, धुळ्याच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंगला चौधरी आदी मान्यवरांबरोबरच मेळावा आयोजनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सुनीता सोनवणे यांचा, तर वधू-वर परिचय पुस्तिकेचे उत्कृष्ट व वेळेत काम केल्याबद्दल पुस्तक समितीचा सत्कार करण्यात आला.