वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला खूश करायचे अलसे तर आपण त्या व्यक्तीला आवडेल तेच करतो. देवाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे. मग देवाला काय आवडते ते जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आवडे देवाशी तो ऐका प्रकार | नामाचा उच्चार रात्रंदिवस || तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा | ऱ्हदय कळवळा वैष्णवांचा || म्हणजे भगवंताच्या नामाचे चिंतन आणि गळ्यात तुळशीची माळ हीच गोष्ट देवाला खुप आवडते. म्हणून देवाला आवडण्यासाठी वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

तुळशीची करिता सेवा | होय देवा प्रिय तो || संत एकनाथ महाराजही सांगतात की, बाबांनो तुम्हाला जर देवाला प्रिय व्हावे असे वाटत असेल तर इतर कोणत्याही साधनांची खटाटोप करू नका तुळशीची सेवा करा. नाथ महाराज आणखी एक प्रमाण देऊन सांगतात की, देवा प्रिय तुळशी पान। नव्हे कारण यज्ञाचे॥ अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल तर केवळ तुळशीची पूजा करा.

तसेच वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत नामदेव महाराजही म्हणतात, भगवंताची कृपा होण्यासाठी प्रत्येक घराच्या दाराबाहेर तुळशीवृंदावन असायला हवे.

उभे वृंदावन जयाचिये द्वारी। होय श्रीहरी प्रसन्न त्या॥ तुळशीचे रोप लावील आणोनी। तया चक्रपाणी न विसंबे॥

ज्या वैष्णवाच्या दारात तुळशीवृंदावन आहे, देव त्या आपल्या प्रिय भक्ताला कधीही विसरत नाही. तुळशीची सेवा केल्याने आपल्यावर पांडुरंगाची कृपादृष्टी सदैव राहते. तर पांडुरंगाने स्वत:ही तुळशीमाळ धारण केलेली आहे. म्हणूनच त्याचे रूप अतिशय सुंदर, गोजिरवाणे वाटते. या लोभस रूपाचे वर्णन करताना जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटेवरी ठेवोनिया॥ तुळशी हार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेची ध्यान॥