नदीपात्राच्या जवळ आढळलं अर्भक, पोस्टमार्टम करताना डॉक्टर हैराण-परेशान

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील नदीजवळ एका कापडामध्ये अर्भक सापडल्याने एकचं खळबळ उडाली होती. मात्र, त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक प्रकार म्हणजे, ज्यावेळी या अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांना हसावं की रडावं कळेना. कारण, ज्या अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले होते ती एक बाहुली असल्याचं नंतर स्पष्ट झालं.

मिळालेली माहितीनुसार, गुरुवारी जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा इथल्या नदीत सायंकाळी स्त्री जातीचे नवजात अर्भक मिळाल्याची माहिती गावकऱ्यांना कळली. लगेच गावकऱ्यांनी पोलीस पाटलासोबत घटनस्थळी धाव घेत मृत अर्भक असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेऊन पंचनामा करत त्याला खामगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात दाखल केले आणि १७४ कलमा नुसार नोंद ही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.

पण जेव्हा डॉक्टरांनी ते बालक हात लावून शवविच्छेदनासाठी पाहिले असता ते नवजात बालक नसून एका बाहुला असल्याचं समोर आलं. शवविच्छेदन करताना अर्भकाच्या पोटातून कापसाचे बोळे निघत असल्याने डॉक्टरांना घाम फूटला. मात्र, काही वेळातच हे अर्भक समजून आणलेले मृतदेह नसून बाहुले असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास टाकला.

परंतु, घडलेल्या या सर्व प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पिंपळगाव राजा पोलिसांनी पंचनामा कसा आणि काय केला? घटनास्थळी नेमकी काय तपासणी केली, पंचनामा करताना कोणत्या बाबींचा उलगडा करण्यात आला. यासंदर्भात आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. प्रत्यक्षदर्शिनी सांगितल्यानुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती कोणी कोणाला हात लावत नसल्यामुळे या बालकाच्या बाबतीत सुद्धा असे घडल्याचं म्हटलं. पण ते नवजात बालक नसून ती एक बाहुली असल्याची माहिती खामगाव सामान्य रुग्णालयाने दिली आहे.