पाकला झटका ; कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणी स्थगितीची मागणी ‘आयसीजे’ने फेटाळली

हेग : वृत्तसंस्था – कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली आहे.  कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आज, मंगळवारी (दि.१९) हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पाकिस्तानचे ॲड-हॉक जज आजारी असल्याने सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली. मात्र, ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. यावेळी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान यांनी पाकिस्तानची बाजू मांडली.

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पाकिस्तानचे ॲड-हॉक जज तसादूक हुसैन जिलानी यांना सुनावणीपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे यानंतर पाकिस्तानकडून नवीन जजची नियुक्ती केली जाणार आहे. तोपर्यंत सुनावणी स्थगित ठेवावी, अशी विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली होती. मात्र, ती फेटाळून लावण्यात आली.

जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी ‘जैश-ए-मोहम्मद’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुलभूषण जाधव प्रकरणी सोमवार (दि.१८) पासून हेग येथील न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यात कुलभूषण आणि भारताची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडत आहेत.

भारत आणि कुलभूषण जाधव यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. त्यांना अवैधरित्या तुरुंगात डांबून ठेवले. तसेच चुकीचे मुद्दे उपस्थित करत पाकने कुलभूषण यांना मदत नाकारल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी केले.

महत्त्वाचे म्हणजे, कुलभूषण जाधव प्रकरणी ही सुनावणी २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सुनावणीदरम्यान भारत आणि पाकिस्तान दोघेही आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपापली बाजू मांडणार आहेत. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील न्यायालयाने  कुलभूषण जाधव यांना एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर मात्र भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

You might also like