10 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्याला बेड्या, मुलाची सुखरुप सुटका

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – दहा लाख रुपयांच्या खडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली. अपहरण झालेल्या मुलाला चुंचाळे शिवारातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी एका परप्रांतीयास अटक करण्यात आली असून त्याच्या इतर तीन साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. मुलाच्या सुटकेसाठी गुन्हे शाखा आणि सरकारवाडा पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती.

साहिलकुमार अरुणकुमार झा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कैलास गणपतराव जाधव (रा. चोपडा लॉन्स, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती.

कैलास जाधव यांचा अकरावीत शिकणारा सतरावर्षीय मुलागा ५ फेब्रुवारीला सकाळी कॉलेजला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. सायंकाळपर्य़ंत तो घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागला नाही. मुलगा बपत्ता असल्याची तक्रार कैलस जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, जाधव यांना मोबाईलवर अपहरणकर्त्याने संपर्क साधला. त्याने मुलगा पाहिजे असल्यास दहा लाख रुपये द्या. पैसे देऊन मुलाला घेऊन जा असे जाधव यांना सांगितले. पोलिसांना जाधव यांच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाले असल्याची खात्री झाली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून गुन्हे शाखा आणि सरकारवाडा पोलिसांची संयक्त पथके तयार करुन मुलाचा शोध सुरु केला.

मुलाच्या वडिलांकडून पैसे घेतना आरोपीला ताब्यात घेण्याची व्यूहरचना पोलिसांकडून आखण्यात आली होती. मात्र, आरोपींनी वेळोवेळी पैसे स्विकारण्याची जागा बदलल्याने पोलिसांना आरोपी सापडत नव्हता. दरम्यान, आरोपी चुंचाळे अंबड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलाची सुटका करण्यासाठी आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी यांचे पथक चुंचाळे येथे पाठवण्यात आले. या पथकाने परिसरात मुलाचा शोध घेत असताना आरोपी झा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मुलाला एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याचे सांगितले. पथकाने आरोपी झा याला सोबत घेऊन मुलाची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी साहिलकुमार झा याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून त्याचे इतर तीन साथिदार फरार झाले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रवींद्र बागुल, यमाजी महाले, वसंत पांडव, आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकाने केली.