यंदाची दिवाळी बच्चेकंपनीसाठी होणार अधिक सुरक्षित…

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन (कुमार चव्हाण) – दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाक्यांमुळे दुर्घटना होण्याचे प्रमाण अधिक असते म्हणूनच न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. विशेषत: लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांना झालेली इजा तर आयुष्यभरासाठी अडचण ठरते . फटाक्यांचे अपघात जीवावर देखील बेतले आहेत. पण याच बरोबर पुण्यातील सेफ किड्स फाऊंंडेशन इंडिया तर्फे देखील याकरिता पाऊल उचलले गेले आहे.

सेफ किड्स फाऊंंडेशन इंडिया तर्फे फटाक्यांच्या वापराबाबत आवश्यक असणाऱ्या आग सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम 10 दिवसांचा आहे. या जागृती अभियानादरम्यान हनिवेल प्रायोजित असलेल्या सेफ किड्स अॅट होम प्रोग्राममधील आग सुरक्षा पद्धती अधोरेखित केल्या जातील. सेफ किड्स फाऊंंडेशन इंडिया ही एक आघाडीची स्वयंसेवी संस्था आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी काम करणे हे या स्वयंसेवी संस्थेचे वैशिष्ठ्य आहे.

पुणे महानगरपालिका (पीएमसी) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रॅलीज, रोड शोज, प्रदर्शने तसेच वाॅकथाॅन, किड्स कार्निव्हल, पोस्टर मेकिंग स्पर्धा यांसारखे संवादात्मक उपक्रम आयोजित केले जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक हे आगीच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी अग्निसुरक्षा मित्र या नावाने फायर मार्शल्स म्हणून समाविष्ट केले जाणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत सेफ किड्स अॅट होम प्रोग्रामद्वारे असे 621 अग्निसुरक्षा मित्र प्रशिक्षित केले गेले असून 300 माॅडेल फायर सेफ स्कुल्स व 100 माॅडेल फायर सेफ कम्युनिटीज विकसित करण्यात प्रवर्तक ठरले आहेत.

याप्रसंगी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले की, आम्ही कोणत्याही आगीच्या आपत्कालीन प्रसंगी सामोरे जाण्यासाठी तयार आहोतच. परंतु त्याचबरोबर पुण्यातील नागरिकंनी फटाके उडवण्याच्या सुरक्षेबाबत उपाययोजना राबविल्यास आपण दिवाळी सुरक्षितपणे साजरी करु शकतो. तसेच, या अभियानासह आम्ही दरवर्षी या मोहिमेचा प्रसार वाढविण्यासाठी सेफ किड्स फाऊंंडेशन इंडिया या स्वयंसेवी संस्थेसोबत सहयोग करत आहोत.

पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे म्हणाले की, दिवाळीच्या काळात आमच्या दलातील अग्निशामक सावध(हाय अलर्ट) असतात. नागरिकांमध्ये विशेषत: मुले व त्यांचे पालक यांच्यात आगीच्या सुरक्षितेविषयी जागरूकता वाढविल्यास प्रत्येकाकडून आमच्या प्रयत्नांना समर्थन मिळेल आणि आगीपासून होणाऱ्या घटना कमी होण्यास मदत होईल, असे आम्हाला वाटते.

सेफ किड्स फाऊंडेशनच्या प्रोग्राम डायरेक्टर डाॅ. सिंथिआ पिंटो म्हणाल्या की, दिवाळी हा असा काळ असतो ज्यावेळेस आगीशी निगडीत अपघात होण्याचा धोका जास्त असतो. भाजण्याच्या व जखमेच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपायोजना अवलंबिण्याबाबतचे महत्त्व मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हवी हे आमचे उद्दिष्ट आहे.

आयएमआरबी रिसर्चचा पाठिंबा असलेल्या सेफ किड्स अॅट होम प्राेग्रामद्वारे अद्ययावत प्रायोगिक व रंजक शैक्षणिक साधनांचा वापर करून 2019 पर्यंत 4,85,000 मुले व 4,00,000 पालकांना फायदा व्हावा हे उद्दिष्ट आहे.
जाहिरात