धक्कादायक ! महिला वकिलाचा पुणे न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज (शुक्रवार) न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली. या महिला वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला.

संबंधीत महिला वकिलावर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची आज सुनावणी होती. या सुनावणीसाठी त्या जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या न्यायालयात हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर या महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या जमिनीवर पडल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून महिलेला रुग्णालयात दाखल केले. रोहित टिळक यांचे वकील नंदू फडके यांच्या अपहरणाचा प्रयत्न आणि त्यांचा मुलगा संदीप फडके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकणामध्ये आत्तापर्यंत चारजणांना अटक केली आहे तर संबंधीत महिला वकिलाला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

महिला वकिलाने डेक्कन पोलिसांना अर्ज करून आपण तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असून पोलिसांनी चौकशी करावी असा अर्ज दिला आहे. मात्र, रोहित टिळक यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना गुंतवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने त्या तणावात आहेत. अशी माहिती त्यांचे वकिल मिलिंद पवार आणि अहमद खान पठाण यांनी सांगितले. तसेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नसून दोन दिवसांपासून त्यांनी व्यवस्थित जेवण न केल्याने त्यांना चक्कर आली असल्याचे अहमद पठाण यांनी सांगितले.