पुरंदर-हवेलीत बदलले बसस्थानकांचे रुप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर हवेलीतील रस्त्यांना झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता तालुक्यातील बस स्थानकांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलत आहे. पुरंदर विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निधीतून २३ गावात प्रेक्षणीय बसस्थानके उभारली जात आहेत. हिवरे, चांबळी, बोपगाव, भिवरी, पवारवाडी, दिवे, झेंडेवाडी, काळेवाडी, वडकी, उरुळीदेवाची, नारायणपूर, कोडित, येवलेवाडी,शिवरी,साकुर्डे, दौंडज, पिसुर्टी, जेऊर, थोपटेवाडी, कोडित, ढुमेवाडी, आस्करवाडी इत्यादी गावात या बस स्थानकांची कामे केली जात आहेत.

याबाबत बोलताना शिवतारे म्हणाले, पुरंदर हवेलीत मागील पाच वर्षात आपण ६०० कोटीपेक्षा जास्त निधी रस्त्यांसाठी आणला आहे. त्यातून जवळपास ६७३ किलोमीटर रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण संबंध राज्यात रस्त्यांची एवढी कामे २८८ पैकी कुठल्याच मतदारसंघात झालेली नाहीत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, गुंजवणी, राष्ट्रीय बाजार यामुळे आपला तालुका आता नवीन पुणे होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असणारी बस स्थानकेसुद्धा या प्रगतीला शोभतील अशीच करण्याचा निर्धार मी केला आहे. त्या दृष्टीने तालुक्याच्या प्रत्येक गावातील, वाडीवस्तीवरील बस स्थानक बदलण्याचे माझे प्रयत्न आहेत. पहिल्या टप्प्यात आपण २३ बस स्थानके करीत असून उर्वरित बस स्थानकेही नवीन केली जाणार आहेत.

शिवतारे यांची कामे अभिनव : सरपंच कोमल लिंभोरे
शिवरी येथे अशाच पद्धतीचे बस स्थानक उभारले आहे. याबाबत बोलताना सरपंच कोमल लिंभोरे म्हणाल्या, शिवतारे यांच्या संकल्पना नेहमीच अभिनव अशा स्वरूपाच्या असतात. जेजुरी रुग्णालय, विमानतळ, राष्ट्रीय बाजार, प्रशासकीय इमारत यातील भव्यता त्यांच्यातील अभियंत्याची साक्ष देणारी आहे.