त्या’ तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गजाआड

नाशिक रोड : पोलीसनामा ऑनलाईन – हळदीच्या समारंभात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून दहा ते अकरा तरुणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. हा प्रकार २८ जानेवारी रोजी जेलरोड येथील चंपानगरी येथे घडला होता. याप्रकरणातील मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड रोहित पाखरे याला शिर्डी येथून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली असून पाखरे हा फऱार होता.

जेलरोड भागातील कॅनॉलरोड लगत असलेल्या चंपानागरी येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री साडेनऊ वाजता या ठिकाणी रोहित पारखे, करण केदारे, विशाल झुलाल जाधव, बाळा सुरेश केदारे, ललित प्रवीण वाघळे, मयूर गायकवाड, सागर बाळू गांगुर्डे, समाधान सुरेश आव्हाड, अमित गौतम वाघमारे, आशिष वाघमारे तिथे आले होते. यावेळी त्यांच्यात मागील भांडणाची कुरापत काढून शाब्दीक चकमक झाली.

यावेळी रोहित वाघ या तरुणाने या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे, भांडण करू नका व निघून जा, असे सांगितले असता सर्वजण तेथून निघून गेले. मात्र रात्री दहा वाजता संशयितांबरोबर तीन चार युवक शस्त्रांसह दुचाकीवरून पुन्हा हळदीच्या ठिकाणी आले. पुन्हा धिंगाणा घातला असता रोहित वाघ, त्याचा मित्र रितेश पांडव, अलकेश जॉन यांनी समजविण्याचा प्रयत्न केला मात्र रोहित पारखे व करण केदारे यांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यामध्ये रोहित वाघ यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर रितेश व अलकेश हे गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहित पारखे व करण केदारे हे फरार होते. त्यापैकी रोहित पारखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून करण केदारे हा फरार आहे. रोहित पारखे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर याआधीही पोलिसात तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत अमित वाघमारे, ललित वाघळे, सागर गांगुर्डे, विशाल जाधव, समाधान आव्हाड, बाळा केदारे, एक अल्पवयीन युवक व मुख्य सुत्रधार रोहित पारखे यांना अटक करण्यात आली आहे.