आरोग्य विभागातील बोगस नोकर भरती प्रकरणी मुख्य सुत्रधाराला अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य विभागाची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे नोकरीसाठी मेगा भरती असल्याचे भासवून राज्यभरातील हजारो तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराला लातूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

जितेंद्र भोसले या मुंबईतील आरोपीला या प्रकरणी अटक केले आहे. लातूर एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या  नोकरीसाठीच्या मुलाखती थेट पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत. याची यादीदेखील ससूनच्या नोटीस बोर्डावर लावली होती.

जितेंद्र भोसले याने आरोग्य विभागाची बनावट वेबसाईट तयार करून ९५६ जागांची भरती आयोजित केली होती. यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सुरक्षा रक्षक आणि सेवक पदाची भरती करण्यात येणार असल्याचे दाखवले.

जितेंद्र भोसले याचा मुंबईत बीअरबार असल्याची माहिती आहे. हा आपल्या सावजांना हेरताना पॉश गाड्या घेऊन येत होता. गाड्यांवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड देखील लावायचा. तसेच सोबतीला पीए, सुरक्षा रक्षक असा लवाजमा देखील असायचा. शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये तो उतरत असे. यामुळे सावज आपोआप त्याच्या जाळ्यात सापडायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वेबसाईटवर यादी दाखवून नोकरी लावतो असे सांगून सात ते दहा लाखांपर्यंत पैसे घेत होता. लातूर, परभणी आणि मुंबईत जितेंद्र अनेक लोकांकडून पैसे घेतले आहेत. केवळ लातूर जिल्ह्यातूनच तीस पेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले असावेत अशी माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ ही बोगस वेबसाईट बंद केली आहे.

तरुणांकडून लाखो रुपये घेतल्यानंतर काही दिवस हे सर्व जण गायब झाले होते. त्यानंतर अचानक पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पत्र काही जणांना मिळाले. त्यामुळे अनेक जण ससून रुग्णालयात मुलाखतीसाठी पोहचले. तिथे त्यांच्या मुलाखतीही झाल्या.

त्यानंतर काही दिवसांनी या मुलाखतीतून निवडलेल्यांची यादीही ससूनच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली होती. आपल्याच येथे नोकर भरतीसाठी आपल्याच आवारात मुलाखती होतात, त्याची यादी नोटीस बोर्डावर लावली जाते, तरीही याचा लांगपत्ता ससूनच्या प्रशासनाला लागला नाही. या प्रकार समोर आल्यानंतर ससूनच्या प्रशासनाने कानावर हात ठेवून आपला काही त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगितले होते.

या मुलाखती झाल्यानंतर पुढे काहीच झाले नसल्याने शेवटी काही तरुणांनी पोलिसांकडे धाव घेत फसवणूक झाल्याची प्रकार केली. त्यावरुन लातूर एमआयडीसी पोलिसांनी जितेंद्र भोसले याला अटक केली आहे.

त्याने परभणी, गंगाखेड आणि मुंबईच्या ग्रामीण भागात देखील केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जितेंद्रला मदत करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.