शहरात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा का वाढला, पुण्याच्या महापौरांनी केला महत्त्वाचा ‘खुलासा’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यातील मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले आहेत. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने पुणेकरांसमोरील चिंता वाढली आहे. मात्र, याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. सोमवारी आलेली कोरोनाबाधितांची 399 ही संख्या 22,23 आणि 24 मे या ती दिवसांच्या शिल्लक सॅम्पलची आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आपण घेतलेले सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले जातात. मात्र, एनआयव्हीकडेही क्षमतेपेक्षा अधिकचे काम सुरु असल्याने काहीसा वेळ लागत आहे. त्यामुळे 399 ही संख्या अधिक दिसल्याने भीती निर्माण झाली. सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंग वेगाने कमीत कमी वेळात व्हावे, म्हणून आपण राज्य सरकारकडे पुणे शहराला तातडीने नवी टेस्टिंग लॅब सरु करण्याची मागणी कली आहे. या मागणीनंतर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तरच हे शक्य आहे. शिवाय यासाठी आपली महापालिका निधीही देण्यास तयार असल्याने ही प्रक्रिया वेगाने व्हावी असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुण्याची मागील दोन दिवसांची स्थिती

पुणे शहरामध्ये 26 मे रोजी नव्याने 246 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 5 हजार 427 झाली आहे. तर 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 2 हजार 279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 26 मे रोजी 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 43 हजार 907 एवढी झाली असून आज 2044 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. तर पुणे शहरात 25 मे रोजी नव्याने 399 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 5181 झाली आहे. तर 175 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 2182 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 25 मेला 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.