CM उद्धव ठाकरेंनी पवारांकडे बोलून दाखवली नाराजी, ‘हे’ होते चर्चेमधील मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या निर्णयांमुळे वाद पेटला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत ठाकरे यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यावर तिन्ही पक्षांना एकत्र सांभाळण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यातच आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. त्यानंतर पवार यांनी बैठक घेतली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाले नसले तरी अधिकार्‍यांच्या बदल्यावरून ठाकरे नाराज झाले होते. त्यांची नाराजी आता दूर करण्यात आली आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली करण्याआधी मुख्यमंत्र्यांना कळविण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. त्याशिवाय नगर जिल्ह्यात पारनेरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर हे पाच नगरसेवक परत पाठवा असा निरोपही सेनेकडून देण्यात आला होता. पण, याबद्दल अधिकृत अशी कोणतीही माहिती पुढे आला नाही.