मराठा क्रांती मोर्चाची रविवारी सांगलीत बैठक 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची  राज्यस्तरीय बैठक रविवार, दि. 17 रोजी सांगलीतील भारती हॉस्पिटल मध्ये होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून, मराठा आरक्षण व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची रणनिती या बैठकीत निश्‍चित करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील यांनी दिली.

मुंबईत दि. 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती महामोर्चा झाला. मराठा आरक्षणासह, मराठा युवक, युवतींना शिक्षणात सवलती, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक व अन्य आश्‍वासने शासनाने दिली होती. या सर्व आश्‍वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाची यापुढील वाटचाल, आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची रणनिती व नव्याने समाज बांधणीसाठी या बैठकीत ठोस निर्णय होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील समन्वयक सांगलीतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला गुणात्मक पुरावे सादर केले जाणार असुन, त्यासाठीचे कागदोपत्री पुरावे गोळा केले जात आहेत.

संयोजक प्रशांत भोसले, संजय देसाई, किरण पाटील, सतीश साखळकर, संभाजी पोळ, योगेश पाटील, अजय देशमुख, महेश घार्गे, संदीप राऊत, धनंजय वाघ, विलास देसाई, अमृतराव सूर्यवंशी, आर. जे. पाटील, चंद्रकांत पाटील, श्रीरंग पाटील, राहुल पाटील, राहुल जाधव, नितीन चव्हाण, प्रशांत पवार, प्रवीण नांदवलेकर, अमोल बोराडे, अविनाश बागल, अमृत पवार, रवी खराडे, शिवाजी मोहिते, धनंजय पाटील, रणजीत जाधव, विश्‍वजीत पाटील व कार्यकर्ते हे या बैठकीचे संयोजन करीत आहेत.