व्यापाऱ्याचे अपहरण करुन दीड कोटी खंडणी केली वसुल खंडणी मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची सुटका, पाच जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री अपहरण करण्यात आले असून अपहरण कर्त्यांनी दीड कोटी रुपयांची खंडणी वसुल केल्यानंतर आज सकाळी पुणे सातारा रस्त्यावर या व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली. गुरुवारी रात्रभर सुरु असलेल्या या ऑपरेशन मध्ये शहर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षाच्या व्यापाऱ्याचा मार्केटयार्डमध्ये गाळा आहे. त्यांचा मुलगा बांधकाम व्यवसायिक आहे. गुरुवारी रात्री हे व्यापारी आपला गाळा बंद करुन घरी जात होते. यावेळी कारमधुन आलेल्या गुन्हेगारांनी वखार महामंडळाजवळून त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले. त्यांना घेऊन ते अज्ञातस्थळी गेले. त्यानंतर त्यांंच्याकडून मुलाचा मोबाईल नंबर घेऊन त्याला फोन करुन दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यांनी तातडीने अपहरणाची ही माहिती गुन्हे शाखेला रात्री दिली. भर रस्त्यातून व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा खडबडून जागी झाली.

गुन्हेगारांनी मुलाशी बोलणे केल्यावर दीड कोटी रुपये आणून देण्याचे सांगण्यात आले होते. ही रक्कम मध्यरात्री एका ठिकाणी पैसे आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार एका बॅगेत पैसे ठेवून ती बॅग तेथे ठेवण्यात आली. यावेळी पोलीस सभोवताली पाळतीवर होते. मात्र, गुन्हेगारांनी पैशाची बॅग घेऊन धुम ठोकली.

पैसे मिळाल्यानंतर खंडणीखोरांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या व्यापाऱ्याला पुणे सातारा रोडवरील केळवडे येथे सोडून ते पळून गेले. या व्यापाऱ्याचे डोळे बांधले असल्याने त्यांना आपण कोठे आहोत, हे कळत नव्हते. त्यांनी तेथून जाणाऱ्या एकाकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडील मोबाईलवरुन मुलाशी संपर्क करुन आपल्याला सोडले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातून याप्रकरणातील ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com