नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गात बदल केल्याने सभागृहात गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नगर रस्त्यावरील प्रस्तावित मेट्रो मार्गात बदल केल्याचे पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. मार्गात बदल करण्याचा निर्णय कोणाच्या फायद्यासाठी घेतला ? एकदा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर मार्गात बदल करण्यासाठी सभेची मंजुरी का घेतली नाही ? अशा प्रश्नांचा भडिमार करुन प्रशासनाला विरोधकांनी धारेवर धरले.

आयुक्त सौरव राव यांनी यासंदर्भात केलेल्या खुलाश्याने नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट महापौर मुक्ता टिळक यांच्या आसनासमोर येऊन गोंधळ घातला. नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी वर्गीकरणाच्या मंजुरीच्या प्रस्तावावरील चर्चेत नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाच्या बदलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, सुनील टिंगरे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आदींनी प्रशासन आणि मेट्रो प्रशासनावर टिका केली. नगर रस्त्यावर गुंजन चित्रपट गृह चौक येथे उजव्या बाजूला वळवून प्रस्तावित खराडि – शिवणे रस्त्यावरून कल्याणीनगर येथे डावीकडे वळवून पुन्हा नगर रस्त्यावर मेट्रो आणली जाणार आहे. हा बदल ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी हा बदल केला असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

याबाबत खुलासा करताना आयुक्त राव म्हणाले, ”प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या शंभर मीटरच्या आत आगाखान पॅलेस ही संरक्षित वास्तू येत आहे. त्यामुळे मेट्रो च्या मार्गात बदल करावा लागला. याविषयी मेट्रोने तीन पर्यायांचा विचार केला. त्यापैकी हा पर्याय व्यवहार्य असल्याचे मत मेट्रो प्रशासनाचे झाले आहे. याविषयी संपुर्ण खुलासा देण्यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ते पुढील सर्व साधारण सभेत खुलासा करतील”